छत्रपती संभाजीनगर, दि. १२ मार्च – जागतिक किडनी दिनानिमित्त डॉ. हेडगेवार रुग्णालयात अवयवदात्यांचा सत्कार करून अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यानिमित्त किडनी आजार या विषयावर पोस्टर स्पर्धा व पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रुग्णालयातील कर्मचारी तसेच डॉ. हेडगेवार रुग्णालय कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. मिनाक्षी राठोड (वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर) यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करताना अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळते, असे सांगितले. मृत्यूनंतर शरीराची राखच उरते, त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. पाळवदे यांनी सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी अवयवदानासाठी प्रतिज्ञापत्र (Pledge Form) भरून देणे आवश्यक असल्याचा संदेश दिला. कार्यक्रमात किडनी दाते उपस्थित होते. किडनी प्रत्यारोपणानंतर घ्यावयाची काळजी तसेच पुढील आरोग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत अनेक रुग्णांना अवयवांची गरज आहे; मात्र अवयवदानाला मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याचे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे संचालक डॉ. महेश देशपांडे यांनी सांगितले. तसेच ६ जानेवारी रोजी अवयवदान केलेल्या देशमुख कुटुंबियांचा विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला. यावेळी श्री. देशमुख यांनी अवयवदानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमाला रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. महेश देशपांडे, संस्थेचे विश्वस्त डॉ. पिनाकिन पुजारी, अतिदक्षता विभागतज्ज्ञ डॉ. सुधीर देशपांडे, किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. नीरज इनामदार, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. ऋतुराज पेंडकर, भूलतज्ज्ञ मेधा कुलकर्णी व डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. गणेश शिंदे, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. प्रवीण ठाकरे, अवयवदान समन्वयक श्री.अनिल घोगरे, श्री.शिवाजी फटांगडे तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर, अधिकारी, व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.
COPYRIGHT © DR BABASAHEB AMBEDKAR VAIDYAKIYA PRATISHTHAN